Blog: रत्नागिरी भटकंती.

Blog Written by रोहित पाटिल ---------

ढाक-बहिरी ट्रेक च्या वेळीच निलेश बरोबर बोलणे झाले होते कि एखादा बाईक ट्रेक/टूर करुया.
फोनाफोनी करून आणि बरेच जागा नाकारून शेवटी जायचे ठिकाण ठरले. रत्नागिरी जिल्हा
मार्लेश्वर - पूर्णगड - रत्नागिरी - रत्नदुर्ग - गणपतीपुळे - जयगड - हेदवी
यासाठी सलग ३ दिवस पाहिजे होते. सोमवारी सुट्टी टाकून जायचे नक्की केले. हि बाईक ट्रेक/टूर ट्रेक-मेटसच्या नावाखाली प्रसिद्ध केली. विचार हा होता कि जास्त जण असले तर मजा येईल. २७ मार्च २००९ ला ऑफिसमधून परत आलो आणी झोळी बांधून पनवेलला निलेशच्या रूमवर निघालो. रात्री रूमवर पोहोचेपर्यंत ११.३० वाजले. तिथे प्रीती, प्रीतम आणि प्रशांत हजारच होते. जास्त वेळ झोप मिळणार नव्हती म्हणून गप्पांना फाटा देऊन झोपायची तयारी केली.
सकाळी ५.३० ला उठून फ्रेश होऊन कळंबोली MacD निघालो.
IMG_3560.jpg
तिथे पोहोच्यावर कळले पुण्यावरून येणारे पब्लिकने कल्टी मारली आहे फक्त ८ जण आहेत या टुरसाठी.मनात आले ठीक आहे जेवढे जण आहेत तेवढे खूप आहेत. बाईक ट्रेकला जास्तजण असले तर प्रत्येक थांब्याला खूप वेळ लागतो असा अनुभव होताच.
मी निलेश, प्रीती, प्रशांत, प्रीतम, विनायक, संकेत - अंबिका हे नवरा-बायको एवडेच होतो. आमच्यामधील प्रशांत हा सर्वाधिक हौशी होता. सकाळी नाशिक वरून निघाला बाईक वरून आणि ठाण्याला पोहोचला मामाकडे आणी तिथून संध्याकाळी निलेशच्या घरी.
IMG_3563.jpg
माणसे ८ आणि बाईक ५ होत्या म्हणून प्रीतमने त्याची बाईक परत जाऊन निलेशच्या घरी पार्क केली, आणि विनायकच्या बाईकवर मागे बसला. निलेश-प्रीती आणी संकेत - अंबिका पल्सर१८० वर, प्रीतम-विनायक बजाज अवेन्जेर वर, मी आणी प्रशांत Spendar वर. हाहा" alt="हाहा" class="smiley-content"> अश्या जोड्या जमल्या.MacD वरून निघालो आणी पेट्रोलपंपावर गाड्या घुसवल्या. एकदाच काय तो सुरुवातीला वेळ जाऊंदे. नंतर सारखे थांबायला नको. टाक्या फुल करून NH17 वरून सुसाट निघालो.
IMG_3564.jpg
मी नेहमी प्रवास करताना १ लक्षात ठेवतो कि कितीही लांब फिरायला जायचे असले तरी शेवटच्या दिवशी कमीत कमी प्रवास करावा लागेल. त्यामुळे पहिल्यांदा रत्नागिरी-पूर्णगड गाठायचे आणि तिथून उलट मुंबईकडे येताना फिरायचे ठरले.
सकाळची वेळ असल्याने रहदारी फारशी नव्हती. हवेत गारवा होतो, जो कर्नाळा परिसरात जास्तच जाणवू लागला. तासाभरात वडखळ नाक्याला पोहोचलो. बाईक्स पोट तर पनवेललाच भरले होते आता आमच्या पोटोबाची वेळ झाली होती. हॉटेल मध्ये शिरल्याबरोबर एकेकाची फरमाईश चालू झाली. पोहे, उपमा, मिसळ-पाव, कोथिंबीर वडी, इडली-वडा वर उभा-आडवा हात मारल्यावर चहा मागवला. यथेच्छ पोट भरल्यावर पुढे निघालो.
IMG_3566.jpg
निघताना पुढच्या ब्रेकचे ठिकाण निश्शीत केले, पोलादपूर . कशेडी घाटाच्या पायथ्याचे गाव. मधेच उन्हेरे हे गाव लागले. हे ठिकाण गरम पाण्याच्या कुंडासाठी नाव राखून आहे. आमच्या गाड्या तिकडे वळल्या. तिथे जाऊन बघितले तर काही विद्वानांनी त्या कुंडामध्ये साबणाने स्नान केले होते. बाहेर मोकळ्या जागेत एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले, बहुतेक तो खंड्या होता ( मला पक्षीनिरीक्षण करता येते, पण त्यांचे नाव लक्षात ठेवणाच्या भानगडीमध्ये मी पडत नाही. हे सर्वांनाच लागू , मनुष्यगणातील पण ).
IMG_3631.jpg
मुंबई ते महाड हा बर्यापैकी सरळ रस्ता आहे. कोंकणाची ओळख असलेले नागमोडी रस्ते आणी घाट हे पोलादपूर पासून पुढे चालू होतात ते पार सावंतवाडी उतरून बांदा पर्यंत असेच आहेत.(गोवाच्या पुढे मी गेलो नाही आहे म्हणून मला माहिती नाही) सकाळची वेळ आणि मस्तपैकी थंड हवा यामुळे प्रवासाची मजा येत होती.
IMG_3567.jpg
IMG_3568.jpg
या बाईक टूर साठी हेल्मेट कम्पल्सरी होते, पण इथे तर जसा हायवे लागला तसे हेल्मेट डोक्याऐवजी साइड मिररला लटकले.(सुरवात निलेश पासून झाली.) सर्व बाईक ८०-९० च्या वेगाने धावत होत्या. बाकी ३ बाईक ताकदवान असल्याने जोरात पुढे पळत होत्या. आमच्या बाईकचा जीव १०० CC आणि त्यावर माझे ८५ किलोचे धूड, कसा वेग घेणार. तरी पण प्रशांतने भन्नाट रायडींगने आमच्या व बाकी बाईक मध्ये जास्त अंतर पडू दिले नाही. २- २.३० तासामध्ये पोलादपूरला पोहोचलो. घाट चालू होण्याच्याआधी थोडे फ्रेश होण्यासाठी हा ब्रेक होता. बाकी सर्वांनी चहा सांगितला, पण मला Thumps-Up ची हुक्की आली , निलेशला पण चहा नको Thumps-Up बोलल्यावर त्याला पण तेच पाहिजे होते.
IMG_3572.jpg
मग काय या हॉटेलमधून त्या हॉटेल-दुकानात विचारात फिरत होतो. शेवटी एक ठिकाणी मिळाले नि आमचा गळा थंड पडला.
घाट चढायला सुरवात केली. घाटामध्ये एक ठिकाणी प्रतापगड दर्शनचा फलक दिसला आणि बाईक लगेच रस्त्याच्या कडेला लागल्या. त्यावेळी प्रतापगडला गेलो नसल्याने ओळखता आला नाही. अंदाजानेच एक डोंगराला प्रतापगड मानून पुढे वाटचाल चालू केली.
IMG_3580.jpg
IMG_3583.jpg
IMG_3586.jpg
आता कुठेहि न थांबता पुढे निघालो. तासा-दीड तासात परशुराम घाटात पोहोचलो. घाट चढून गेल्यावर माथ्यावर छोटे पठार आहे. तिथे एक टपरी होती. उन बरेच चढल्यामुळे तहान हि लागली होती. ड्रिंक ब्रेक लगेच ठरवला गेला. तिथेच सावलीत ठेवलेल्या खुर्च्यावर सर्वजन टेकले. पाणी आणी चहाच्या ऐवजी कोकम सरबत, आवळा सरबत ची फरमाईश आली. वशिष्ठी नदीच्या नजारा बघत आराम करत होतो. इथेच संकेत - अंबिका आमच्या बरोबर पुढे न येता चिपळूणला त्यांच्या एका मित्राकडे राहण्याचा निर्णय घेतला.
IMG_3588.jpg
चिपळूण पासून पुढे आम्ही ६ जण होतो. १७ किमी पुढे बोर्ड दिसला , शिवतीर्थगड-डेरवण. हाती असलेल्या वेळेचा आणी पोटाचा विचार करून आम्ही आतमध्ये वळलो. हि जागा उत्तम रित्या राखलेली आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या काळातील बरेच प्रसंग शिल्परुपात चितारले आहेत. त्या शिल्पांचा तसेच श्री शिव समर्थ मंदिराचे दर्शन घेऊन बाहेर पडलो. गडाबाहेरच कॅन्टीन होते दुपारच्या जेवणाचा बेत इथेच केला, परत एकदा पोटोबा थंड करून आम्ही पुढे निघालो.
IMG_3593.jpg
IMG_3609.jpg
IMG_3598.jpg
IMG_3599.jpg
IMG_3600.jpg
IMG_3601.jpg
IMG_3610.jpg
IMG_3612.jpg
IMG_3613.jpg
इथून पुढे निवळी फाट्याला जाऊन डावीकडे वळायचे होते मार्लेश्वर साठी. भरभर पुढे निघालो. दुपार उतरायला सुरवात झाली होती आणि अजून बराच पल्ला बाकी होता. ५-५:३० च्या आसपास मार्लेश्वरला पोहोचलो. पायथ्याची ३/४ दुकाने चालू होती. भरभर वरती चढून गेलो. मला मार्लेश्वरचा प्रसिद्ध धबधबा बघायचा होता.
IMG_3636.jpg
IMG_3637.jpg
IMG_3644.jpg
मंदिराच्या अलीकडे डावीकडे वळून धबधब्या चे पहिले दर्शन झाले. बऱ्यापैकी धार होती. विन्याने तर तिथपर्यंत यायला देखील नकार दिला, पण बाकीचे सर्व जात असताना एकता बसून काय करणार म्हणून तो देखील आम्हाला सामील झाला. पाण्यामध्ये शिरताच दिवसभराचा थकवा आणी बुडाचा त्रास (सवय नाहीना बाईक वरून एवढे फिरायची ) गायब झाला. हा बारमाही(??) धबधबा आहे.
IMG_3655.jpg
मार्लेश्वरचे जंगल बर्यापैकी दाट आहे. इथे पट्टेरी वाघ देखील दिसल्याचा उल्लेख खाली पायथ्याच्या दुकानामध्ये झाला होता. थंड पाण्यामध्ये एवढे बरे वाटत होते कि बाहेर पडायला कंटाळा आला होता. पण ५ मिनिट अजून अजून करत तासाभराने बाहेर आलो.
अंधारून यायला सुरवात झाली होती. लवकर लवकर गुहेजवळ आलो. गुहेमध्ये शिरताना वाकून जावे लागते. तसेच आतमध्ये फक्त समईचा प्रकाश असतो. मार्लेश्वरची गुहा हि त्यामधील सापांसाठी ओळखली जाते. या गुहेमध्ये जिवंत साप(नाग) राहतात. पण ते दंश करत नाहीत असे बोलले जाते. तेथील पुजारयाना विचारले असता ते बोलले कि २/३ दिवस झाले त्यांना देखील काही दर्शन झाले नाही आहे. पण त्यांनी राहत असलेले बिळ दाखवले. इथे विन्याच्या कृपेने आम्हाला शिवलिंगावर माथा टेकायला मिळाला. यावेळेला दर्शनासाठी १/२ भक्त सोडले तर आम्हीच ६ जण होतो. दर्शन घेऊन बाहेर सज्ज्यामध्ये थोडी क्लीककलाट केला. संधिप्रकाश पसरला होता.
IMG_3658.jpg
IMG_3661.jpg
खाली उतरलो आणी छोट्या हॉटेलमध्ये खायला बसलो. हॉटेलवाला आम्हाला लवकरात लवकर पुढे निघायला सांगत होता. पण निघता निघता आम्हाला ८:१५ वाजलेच. टांग टाकून पुढे रत्नागिरीला जायला निघालो. जाताना आता परत निवळी फाट्या ऐवजी देवरुखमार्गे रत्नागिरी-गणपतीपुळे फाट्याला आलो. हातखांब्याच्या अलीकडे हा आहे. इथे येता-येता ९:१५ झाले होते. अजून रत्नागिरी २०किमि आणी रत्नागिरी-पूर्णगड अंतर किती आहे, जायचे कसे ते माहिती नव्हते. विचारात विचारात जावे लागणार होते, म्हणून समोर असणाऱ्या हॉटेलात जेवायचे ठरले.(हा सर्व युक्तिवाद विन्याने केलेला.) जेवणाची चव बरी होती. १०:३० ला तिथून निघालो आणी हातखांब्यावरून उजवीकडे आत वळलो. रत्नागिरीच्या वेशिवरूनच पावसच्या रस्त्याने १ रस्ता पूर्णगडला जात होता. पूर्णगडला पोहोचताना जवळपास १२ वाजत आले. राहायचे कुठे हा प्रश्न नवता तर गावामधून किल्ल्यावर जाणारी वाट कोण सांगेल हा होता. शेवटपर्यंत जिथवर रस्ता आहे तिथवर गाड्या चढवल्या. वाट एका देवळाच्या बाजूला जुन्या वाड्यापर्यंत जाऊन संपली. सुदैवाने देवळामध्ये काहीतरी चर्चा चालू असल्याने माणसे होती.
हा वाडा फडके म्हणून गृहस्त होते त्यांचा होता, यांचे पूर्वज पेशवेकालीन सरदार होते. वाड्याबाहेर बरीच मोठी पडवी होती. रात्री झोपायला उत्तम जागा होती. वाड्याच्या आतमध्ये जाऊन विचारणा केली तर त्यांनी आमची चांगली सोय केली, ते म्हणाले कशाला इथे पडवीमध्ये झोपता. देवळामध्ये जाऊन झोपा. तिथे सतरंजी आहे, वीज आहे, तसेच देऊळ बंदिस्त आहे त्यामुळे कुत्रे देखील सतावणार नाहीत. मनातल्या मनात खुश झालो. असेही आम्हाला मोबाईल व कॅमेरा सेल चार्ज करायचे होते. मोर्चा देवळाकडे वळवला. पथाऱ्या अंथरल्या आणी झोपायची तयारी केली. तरीही गप्पा मारत झोपायला २ वाजलेच.
आज जवळपास ४००किमि चा प्रवास बाईकवरून झाला होता. सिमेंटच्या जंगलातून निघून खऱ्याखुऱ्या जंगलामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो होतो. आज २ जागीच भेट दिलेली असली तरी उद्यापासून खरी भटकंती चालू होणार होती.

सकाळी पूजेला आलेल्या आजोबांच्या घंटेच्या गजराने जाग आली। घड्याळ बघितले तर ७ वाजले होते. पटापट उठलो आणि फडकेच्या मागीलघरी जाऊन फ्रेश होऊन आलो. त्यांच्याकडेच सकाळचा चहा घेतला. मागच्यादारी असताना पोह्यांचा सुगंध आला होता आणि "फडकेंचे पोहे" हा जोक आम्हाला ट्रेक संपेपर्यंत पुरला.(काहीही ओळख नसताना रहायची, फ्रेश होण्यासाठी तसेच चहाची मदत केली याबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे.)

IMG_3664.jpg
IMG_3667.jpg
IMG_3668.jpg
देवळाच्या मागील बाजूने पूर्णगडला जायची वाट आहे. १०-१५ मिनिटामध्ये गडाच्या दरवाज्यामध्ये पोहोचलो. दोन बुरुज समोर ठेऊन लपलेला दरवाजा.
या बुरुजासामोरच हनुमानाचे मंदिर आहे. दरवाज्य बाजूलाच पहारेकर्यासाठी देवड्या आहेत.
IMG_3671.jpg
IMG_3673.jpg
IMG_3674.jpg
IMG_3676.jpg
IMG_3677.jpg
जालावर मिळालेल्या माहितीनुसार मुचकुंदी काडीवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा उपयोग होत होता. गडाचा पसारा जास्त मोठा नाही आहे. गडाच्या आत पदके अवशेष आहेत, ज्याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. तटबंदी मजबूत आहे. तटबंदीवरून फेरी मारता येते. बुरुजांवरून तोफांचा मारा करण्यासाठी बरीच जागा आहे.
खाडीच्या बाजूला गडाचा दुसरा दरवाजा आहे. मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस तटबंदीमधून हे झाड उगवले आहे. याचा आकार युनिकॉर्न(मराठी शब्द माहिती नाही.) सारखा आहे.
IMG_3677.jpg
IMG_3680.jpg
IMG_3684.jpg
IMG_3686.jpg
IMG_3689.jpg
तास-दीड तास फिरून बाहेर पडलो. आणि रत्नागिरीच्या वाटेला लागलो. रत्नदुर्ग पाहून दुपारी जेवायला गणपतीपुळेला जायचा विचार होता. १०:३० झाले होते आणि सकाळपासून काहीही खाल्लेले नव्हते. आमचा विचार रत्नागिरी शहरात जाऊन खाण्याचा होता. पण वाटेमध्ये कोहिनूर समुद्र हॉटेल लागले. विन्याने असहकार पुकारला. नाश्ता केल्याशिवाय पुढे जायला नकार दिला. हॉटेल बघून जाणवले होते कि हे ट्रेकला परवडणारे हॉटेल नाही आहे. इतर वेळी आलो तर जायला हरकत नव्हती. शेवटी विन्याच्या इच्छेला मान देऊन आत प्रवेश केला. बिलपण शेवटी त्यानेच भरले, ट्रेकमध्ये टाकले नाही.
पूर्णगड ते रत्नागिरी प्रवासात आमची मस्ती चालू झाली.
IMG_3703.jpg

पोटोबा शांत झाल्यावर पुढचा प्रवास चालू केला.
रत्नागिरी शहराच्या जवळच हा किल्ला आहे. किल्ल्याची तटबंदी ठिकठिकाणी फोडून रस्ता बनवला आहे. पूर्वी किल्ल्याचा परिसर बराच मोठा असल्याचे लक्षात येते पण आता तेवढा मोठा राहिला नाही. खाली अल्ट्राटेक कंपनीची जेटी दिसत होती. गाडीरस्ता थेट बालेकिल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत जातो. बालेकिल्ल्यावर भगवती देवीचे सुरेख मंदिर आहे. एक भुयार आहे जे खाली समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाते. सध्या हे भुयार बंद केले आहे. तटावरून समुद्राचा तसेच आतमध्ये शिरलेल्या जेटीचा सुरेख देखावा दिसतो. किल्ल्यावर भटकंती करून परत फिरलो.
IMG_3711.jpg
IMG_3720.jpg
IMG_3725.jpg
IMG_3727.jpg
IMG_3729.jpg
IMG_3733.jpg
IMG_3739.jpg
रत्नदुर्ग वरून परताना रत्नागिरीतील समुद्रजीव म्युझियमला भेट दिली. बरेचसे मासे आणि जीव होते, आता नावे आठवत नाहीत. फक्त काही जीव बघून तोंडाला पाणी सुटले होते.
IMG_3756.jpg
IMG_3770.jpg
आरेवारेचा पूल झाल्याने परत फिरून महामार्गावरून गणपतीपुळेला जायची गरज नव्हती. सागरी मार्गाने आम्ही गणपतीपुळेला निघालो. अजून एक हा ट्रेक मार्च मध्ये केला होता. नंतर परत मे मध्ये मित्रांबरोबर कारने आलो तेव्हा या रस्तावर बऱ्याच आमराई आहेत. एका आमराई मधून आम्ही देखील ४ पेट्या घेतल्या होत्या. असो विषयांतर झाले. निसर्गाचा आनंद घेत-घेत जरा उशीरच गणपतीपुळेला पोहोचलो. इथे संकेत आणि अंबिका कधीपासून आमची वाट पाहत होते. समुद्रस्नान करून देवळात दर्शनाला गेलो. प्रदक्षिणा पूर्ण करून पुढचा रस्ता पकडला.
IMG_3772.jpg
IMG_3775.jpg
IMG_3784.jpg
IMG_3786.jpg
जयगडला जाणारा रस्ता समुद्राच्या कडेकडेने जातो. इथून दिसणारे निसर्गाचे रूप वर्णाच्या पलीकडे आहे. एकाबाजूला झाडे , दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये डांबरी रस्ता.
जयगड पोहोचलो तेव्हा 5 वाजत आले होते. आणि विन्याच्या ओरड्यानंतर आमच्या लक्षात आले कि आज भटकंतीच्या नादात कुणीच जेवले नाही आहे. किल्ल्याला जायच्या रस्तावर नाव सार्थ करणारे हॉटेल विसावा होते. विन्याने गाडी दारात थांबवली आणि आपला इरादा स्पष्ट केला. किल्ला समोर असताना जेवायचे मन होत नव्हते आणि थोड्याच वेळात सूर्यास्त देखील होणार म्हणून आमची ओर्डर तिथे विन्याजवळ देऊन किल्ल्यावर निघालो.
IMG_3792.jpg
IMG_3793.jpg
IMG_3796.jpg
हा किल्ला देखील खाडीच्या मुखावर आहे. गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. ३ बाजूला जमीन आणि १ बाजूला समुद्र. किल्ल्याला १०/१५ फुट खोल खंदक आहे. आतमध्ये बऱ्यापैकी शाबूत असलेले बांधकाम आहे. दरवाज्याच्या बुरुजावर सिमेंटचे बांधकाम देखील आहे, फार पूर्वीचे वाटत नाही. जालावरून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय विश्रामगृह असल्याचे कळते.
बाहेरून तटबंदी फारशी उंच नसली तरी आतमध्ये मोठी जागा आहे. आतमध्ये एक लाईट-हाउस तसेच हनुमानाचे मंदिर आहे.
IMG_3799.jpg
IMG_3801.jpg
IMG_3802.jpg
IMG_3805.jpg
IMG_3806.jpg
IMG_3807.jpg
IMG_3823.jpg
आता पोटातले कावळे स्वस्थ बघायला देत नव्हते. परत फिरलो आणि हॉटेल मध्ये आलो. तिथे येऊन बघतो तर विन्याने हॉटेल मध्ये शिल्लक असलेले ७/८ पैकी ५ मासे एकट्यानेच फस्त केले होते. फक्त चिकन बाकी राहले होते. जे काही शिल्लक मिळाले त्यावर तुटून पडलो. जेवणाची चव बाकी मस्त होती. भरपेट खाणे झाल्यावर बिल मागितले तर ते ८०० च्या खाली आले. आम्हाला नवल वाटले कारण आमचा अंदाज बाराशे दीड हजार होता. (याच आमच्या ग्रुप ने मी सोडून बाकी ७ जणांनी मुरुड च्या पाटील खानावळीमध्ये २५०० चे बिल केले होते.)
IMG_3833.jpg
IMG_3835.jpg
बिल भागवल्यावर त्यांनाच हेदवीचा रस्ता विचारला. त्यांनी फिरून रस्त्याने जाण्यापेक्ष्या पुढे गावात जाऊन नावेची चौकशी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पुढे गावात जाऊन विचारले तर एक जण तयार झाला यायला. खाडी पार करून पलीकडे आलो आणि हेदवी कडे निघालो. किनाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये चहाची तल्लफ भागवायला थांबलो. हेदवीला समुद्रकिनारी राहण्याचा आमचा विचार होता पण नुकतेच २६/११ झाल्याने पोलीस आणि कोस्टगार्ड राहायला देणार नाहीत असे कळले.
IMG_3854.jpg
IMG_3867.jpg
गावामध्ये परतून गावातील एका घराच्या अंगणात रहायची परवानगी मागितली आणि ती मिळाली देखील, पण अंबिका असे उघड्यावर राहायला तयार नव्हती. शेवटी ज्यांच्या अंगणात झोपायची सोय झाली होती त्यांच्याच ओळखीने एक रूम घेतली त्यात संकेत-अंबिका जोडप्याला ढकलले. आमचा मुक्काम आम्ही गच्चीवर हलवला. झोपायचा बंदोबस्त तर झाला होता पण झोप येत नव्हती म्हणून परत किनाऱ्यावर निघालो. तिथे कॅम्प-फायर पेटवून गप्पा मारत बसलो.
IMG_3874.jpg
IMG_3875.jpg
IMG_3885.jpg
IMG_3886.jpg
खूप उशिरा परतलो आणि घोरण्याच्या आवाजात झोपायचा प्रयन्त करू लागलो. आजचा दिवस मस्तच गेला होता. मनासारखी भटकंती आणि खादाडी केली होती. उद्याचा दिवस शेवटचा असणार होता. हेदवी बघून दुपारी परतीचा प्रवास चालू करायचा होता. त्याबद्दल विचार करत कधी झोप लागली ते कळलेच नाही.
SHARE

About Unknown